स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील अर्धाअधिक शिक्षकवर्ग सह्या आणि पगारापुरताच!
ज्ञानदान आणि रुग्ण सेवेकडे अक्षम्य दुर्लक्ष!
सुमारे ४८ वर्षापुर्वी स्थापन झालेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या टिचींग स्टाफ (वैद्यकीय शिक्षक वर्ग) पैकी अर्धाधिक स्टाफ हा केवळ सह्या आणि पगारापुरताच वैद्यकीय महाविद्यालयात येत असून वैद्यकीय शिक्षकवर्गाच्या या बेमुर्वतखोर भुमिकेमुळे वेद्दकीय महाविद्यालयातील शिक्षण आणि रुग्णसेवा धोक्यात आली आहे. या धोक्याच्या घंटेकडे विद्यमान आ. नमिता मुंदडा यांनी वेळीच लक्ष घालून केवळ सह्या करुन महिन्याला लाखो रुपयांचा मलिदा मिळवणा-या या वैद्यकीय शिक्षकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
कै. डॉ. व्यंकटराव डावळे यांचे मोठे योगदान!
मराठवाड्यातील शैक्षणिक मागासलेपण दुर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी डॉ. व्यंकटराव डावळे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याच्या रेट्यामुळे १९७५ साली स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळाली. आशिया खंडातील एकमेव ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अशी या महाविद्यालयाची नोंद झाली. या नोंदीमुळेच राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनेतुध या वैद्यकीय महाविद्यालयाचा अल्पावधीतच मोठा विकास झाला. या वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले अधिष्ठाता डॉ. व्यंकटराव डावळे यांनी आपल्या कल्पक दुरदृष्टी आणि वैयक्तिक संबंधांच्या माध्यमातून या वैद्यकीय महाविद्यालयात १९८० त्याही पुर्वी अत्याधुनिक यंत्रसामग्री सह अद्दायालत शस्त्रक्रिया गृह उभे केले.
राज्यातील वेगवेगळ्या शासकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या तज्ञ वैद्यकीय शिक्षकांच्या बदल्या या महाविद्यालयात करवून घेतल्या. येथे येणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांना अधिक सवलती देण्याचा शासकीय अध्यादेश ही डॉ. व्यंकटराव डावळे यांनी काढुन घेतला होता.
ज्ञानदान आणि रुग्णसेवा न करताच महिन्याला लाखोरुपयांचा मलिदा वाटण्याची प्रवृत्ती बळावली
आज या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेला ४८ वर्षे पुर्ण होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयाने या ४८ वर्षाच्या कालावधीत अनेक कर्तदव्यदक्ष अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, लेक्चर्स, हाऊसमन आणि अहोरात्र काम करणाऱ्या परिचारीका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी पाहीले, अनुभवले आहेत. अंबाजोगाई शहरातील अनेक व्यक्तींचा स्नेह वेगवेगळ्या कारणांमुळे या वैद्यकीय महाविद्यालयाशी जोडला गेलेला आहे. शहर आणि परिसरातील अब्जावधी लोकांचे आयुष्य या वैद्यकीय महाविद्यालयाने वाढवले आहे यात शंका नाही. मात्र आज परिस्थिती पुर्णतः बदलली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयात शासनाने लाखो रुपया़चा दरमहा पगार देवून नियुक्त केलेले वैद्यकीय शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे धडे न देता व रुग्णसेवेत डे लक्ष न देता केवळ सह्या आणि पगारापुरतेच बांधील राहीले आहेत. कसल्याही प्रकारचे काम न करता महिन्याला लाखो रुपयांचा मलिदा लाटण्याची यांची प्रवृत्ती बळावत चालली आहे.
४८ वर्षात बदलली परिस्थिती
आज ४८ वर्षानंतर या वैद्यकीय महाविद्यालयातील परिस्थिती बरीचशी बदलली आहे. तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमधील सेवाभावी वृत्ती कमी झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा पगार उचलणा-या वैद्यकीय शिक्षकांपैकी अर्धाअधिक वैद्यकीय शिक्षक वर्ग तर फक्त सह्या आणि पगारापुरताच या महाविद्यालयाशी जोडला गेला आहे.
हे वैद्यकीय महाविद्यालय माझे वैद्यकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात शिक्षणासाठी येणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य शिक्षण मिळावे आणि उपचारासाठी येणा-या रुग्णाला योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
प्रामाणिकपणे काम करणारा वर्ग दबावाखाली
एकीकडे या वैद्यकीय महाविद्यालयाशी बांधिलकी मानणारा वैद्यकीय शिक्षक वर्ग सतत प्रामाणिकपणे काम करीत रुग्णसेवेच्या ओझ्याखाली दबत चालले आहेत तर दुसरीकडे कसलेही काम न करता, महिन्याभरातुन एखाददुसरा दिवस येवून विभागाला आणि अधिष्ठाता यांना तोंड दाखवून लाखो रुपयांचा पगार उचलणा-या वैद्यकीय शिक्षकांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे.
पुर्वी फक्त अनेक विभागप्रमुख ही हिंमत करीत होते, आता अनेक सहाय्यक प्राध्यापक, लेक्चर्स आणि हाऊसमन ही सह्या आणि पगारापुरतेच वैद्यकीय महाविद्यालयाचे तोंड पाहु लागले आहेत. या वैद्यकीय शिक्षकांना ना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चिंता आहे ना उपचारासाठी रुग्णशय्येवर तडपत पडलेल्या रुग्णांच्या जीवाची पर्वा आहे.
चित्र बदलायला हवे!
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय हे अंबाजोगाई शहराची अस्मिता आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाची आजची स्थिती ही या शहराच्या संस्कृतीला साजेशी नाही. या वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेला प्रत्येक वैद्यकीय शिक्षक, कर्मचारी हा लाखो रुपयांच्या पगारी देवून शासनाने नियुक्त केलेला आहे. तो जर काम न करता लाखो रुपये महिन्याला घेवून जात असेल तर त्याला जाब विचारण्यासाठी अंबाजोगाई करांना आता पुढे यावे लागेल आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे हे चित्र बदलावे लागेल.
आ. नमिता मुंदडा यांनी लक्ष घालण्याची गरज
अंबाजोगाई शहराचे आणि केज विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या आ. नमिता अक्षय मुंदडा या स्वतः उच्च शिक्षीत आहेत, अभ्यासु आहेत. राजकारणात नवख्या असल्यातरी पुढील काळातही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय हे अंबाजोगाई करांचा जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा विषय आहे. या वैद्यकीय महाविद्यालयातील अर्ध्याअधिक वैद्यकीय शिक्षकांमध्ये सह्या आणि पगारापुरतीच प्रबळ होत चाललेल्या या प्रवृत्तीला वेळीच लगाम घालण्यासाठी आ. नमिता मुंदडा यांनी पुढाकार घ्यावा अशी या विभागातील नागरीकांची मागणी आहे.