स्थुलपणा जनजागृती व उपचार अभियानाचा ४ मार्च रोजी शुभारंभ!


डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची माहिती
४ शाळांमधुन होणार १५०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग संचालनालयाने केलेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थुलपणा जनजागृती व उपचार अभियानाचा शुभारंभ ४ मार्च रोजी शहरातील ४ शाळांमधील १,५०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन करण्यात येणार असल्याची माहिती या अभियानाचे नोडल ऑफिसर तथा वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ सिध्देश्वर बिराजदार यांनी दिली.


या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. सिध्देश्वर बिराजदार पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालनालयाच्या वतीने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना ४ मार्च पासून स्थुलपणा जनजागृती व उपचार अभियान राबविण्याचा मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या आहेत.
अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ!
या मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहुन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचा शुभारंभ ४ मार्च रोजी येथील योगेश्वरी नुतन माध्यमिक विद्यालयात करण्यात येणार आहे. या मुख्य सोहळ्यास अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पाठक, पर्यवेक्षक रवि मठपती, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच सोबत शहरातील खोलेश्वर माध्यमिक विद्यालय, जिल्हा परीषदेची मुलांची माध्यमिक शाळा, जि. पण. मुलींची माध्यमिक शाळा आणि पोतदार इंग्लीश स्कूल या इतर ४ शाळेत ही या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.


अभियान प्रभावीपणे राबविणार; डॉ. बिराजदार
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालनालयाच्या वतीने सुचना करण्यात आल्या प्रमाणे या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या वैद्यकीय महाविद्यालयात पाच स्वतंत्र टीम करण्यात आल्या असून प्रत्येक टीम मध्ये १ सिनियर टीम लिडर, त्यांचे सोबत ४ पी जी रेसिडेंट आणि प्रत्येक टीमला किमान पाच परिचारीका, एक समाज सेवा अधिकारी किंवा प्रतिनिधी असा स्टाफ कार्यरत राहणार.
या अभियानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शहरातील या पाच माध्यमिक शाळांमध्ये ४ मार्च रोजी सकाळी बरोबर ८ वाजता या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत या माध्यमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून त्याची वैयक्तिक माहिती एका फॉर्म व्दारे संकरीत करण्यात येणार असून स्थुलपणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची ही करणार आरोग्य तपासणी!
४ मार्च रोजी शहरातील ५ माध्यमिक शाळांमधुन या अभियानाची सुरुवात करण्यात येणार असली तरी या महिनाभरात शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी या अभियानांतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती या अभियानाचे नोडल प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी दिली आहे.