सेवानिवृत्त सैनिकांचा जय जवान आजी माजी सैनिक संस्थेकडुन सत्कार
भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या, त्या गावांना मोठा अभिमान असतो. असेच देशसेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या ४ सैनिकांचा आपल्या कुटुंबात सुखरूप परत आल्याबद्दल अंबाजोगाई येथील आजी माजी सैनिक संस्थेकडून ह्रद्य सन्मान करण्यात आला.
अंबाजोगाई तालुक्यातील जे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श सर्व नव्या उमेदीच्या तरूण पिढीने घ्यावा, या विधायक हेतूने निवृत्त सैनिकांचा यथोचित सन्मान करण्याचे काम जय जवान आजी माजी सैनिक संस्थेच्या वतीने सातत्याने करण्यात येते, असाच एक सन्मान सोहळा रविवार, दिनांक ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप हे होते.
यांचा झाला सन्मान
सुभेदार मेजर ताराचंद मस्के, हवालदार विनोद शितोळे, बी.एच.एम राधाकिशन कुंडगर आणि हवालदार राहुल नेहरकर हे चार जवान नुकतेच निवृत्त झाले. या चौघांचा थाटात सन्मान करण्यात आला. निवृत्त सैनिकांच्या सन्मान प्रसंगी सैनिक संस्थेच्या प्रांगणात वसाहती मधील सर्व सदस्य व महिला जमा झाल्या. निवृत्त चार जवान गणवेशात उपस्थित होते, संस्थेतील आजी माजी सैनिकांचा उत्साह पाहून तेही भावूक झाले होते. “भारत माता की जय’ असा जयघोष करीत देशभक्तीच्या वातावरणात सर्वप्रथम महिलांनी या सैनिकांचे औक्षण केले. संस्थेकडून केलेल्या सन्मानाने देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती सन्मानाने फुलून आली होती. यावेळी भावना व्यक्त करताना त्यांना आनंद आश्रूही आले.
असा झाला सन्मान
जय जवान आजी माजी सैनिक संस्थेच्या भव्य प्रांगणात आयोजित कार्यक्रमात कॅप्टन पांडुरंग शेप व उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुभेदार मेजर ताराचंद मस्के व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.विद्याताई मस्के, हवालदार विनोद शितोळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.भाग्यश्रीताई शितोळे, बी.एच.एम राधाकिशन कुंडगर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वर्षाताई कुंडगर आणि हवालदार राहुल नेहरकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.छायाताई नेहरकर या चार जवानांचा त्यांच्या पत्नीसह शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान झाला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सत्कार सोहळ्यास जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे संचालक मंडळ आणि संस्थेतील महिला, पुरूष, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय सैनिकांचा सार्थ अभिमान
आपल्या देशाच्या सिमांचे रक्षण करणाऱ्या बहाद्दर सैनिकांचा आपुलकीने सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, या सैनिकांचा आम्हाला गर्व नक्कीच आहे. भारतीय सैन्यात चांगली सेवा देवून नुकतेच सेवानिवृत्त होवून सुखरूपपणे आपल्या कुटुंबात परत आले, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. युवकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी भारतीय सैन्य दलात भरती व्हावे. कॅप्टन पांडुरंग रघुनाथराव शेप
(अध्यक्ष, जय जवान आजी माजी सैनिक संस्था.)