महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो धीर धरा; जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वाढु शकतात कापसाचे भाव!

देशातील बाजारात मागील दोन दिवसांपासून कापूस दरात (Cotton Rate ) मोठी घट झाली आहे. बाजार समित्यांमधील दरही क्विंटलमागे ५०० रुपयाने कमी झाले आहेत. तर वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. कापूस दरावर पुढील काही दिवस दबाव राहू शकतो. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील (Cotton Market) जाणकारांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात सध्या कापसाचे दर घसरले आहेत. सोमवारी वायदे जवळपास १७०० रुपयांनी कमी होऊन २७ हजार ३०० रुपयांवर बंद झाले होते. मात्र आज दुपारी दोन वाजेपर्यंत वायद्यांमध्ये २०० रुपयांची सुधारणा झाली होती. कापसाचे वायदे २७ हजार ३०० रुपयांवर पोचले होते.
वायद्यांमध्ये कापूस दर कमी झाल्यानंतर बाजार समित्यांमध्येही दरात नरमाई पाहायला मिळाली. सोमवारी कापूस दरात क्विंटलमागे सरासरी ५०० रुपये घट झाली होती. मात्र आज कापूस दर स्थिरावले होते. तर काही बाजारांमध्ये कापूस दरात वाढ पाहायला मिळाली. आज देशातील बाजारांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर राज्यातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी ७ हजार ६०० ते ८ हजार ३०० रुपये होती.

वायदे का तुटले

वायद्यांमध्ये हेजिंग केले जाते. एका महिन्यातील वायद्यांची मुदत संपली की हेजर्स, गुंतवणूकदार किंवा खरेदीदार पुढील महिन्यातील वायद्यांमध्ये पोजिशन घेतात, म्हणजेच वायदे करतात. पण सेबीने एमसीएक्सवर जानेवारी २०२३ आणि त्यापुढील महिन्यांचे वायदे आणण्यास अद्याप परवानगी दिली नाही. म्हणजेच वायदे रोल ओव्हर अर्थात पुढील महिन्यातील वायद्यांमध्ये पोजिशन घेता आली नाही. त्यातच डिसेंबरचे वायदे ३० डिसेंबरला संपतात. त्यामुळे दीर्घकालीन करार वायद्यांमधून बाहेर पडले. म्हणजेच ज्यांना पुढील महिन्यात आपले करार न्यायचे होते त्यांना वायद्यांमधून बाहेर पडावे लागले. त्यामुळे विक्री वाढून दर कमी झाले. पण वायदे संपेपर्यंत कमी झालेले दर पुन्हा वाढू शकतात. म्हणजेच दर पूर्वपातळीवर येऊ शकतात, अशी माहिती वायदे बाजारातील अभ्यासकांनी दि

बाजार समितीतील दर का कमी झाले?

वायद्यांमध्ये दर कमी झाल्याचा कांगावा करत व्यापाऱ्यांनी प्रत्यक्ष खरेदीतील दरही कमी केले. वास्तविक पाहता पोजिशन्स रोल ओव्हर अर्थात पुढील वायद्यांमध्ये नेता न आल्याने वायद्यांमध्ये दर तुटले. हा मुद्दा हेजिंगशी निगडित आहे. त्यात मागणी आणि पुरवठ्याचा संबंध नाही. मात्र प्रत्यक्ष खरेदीत जाणून बुजून दर कमी केले गेले. वायद्यांमध्ये दर कमी झाले, आता कापूस दरात वाढ होणार नाही, असा संभ्रम सध्या निर्माण केला जात आहे. वायद्यांचा दाखला देत बाजार समित्यांमध्येही दर पाडले. मात्र आज वायद्यांमध्ये दर वाढल्यानंतर बाजार समित्यांमधील दर त्याप्रमाणात वाढवले नाहीत.

जानेवारीत वाढणार दर!


सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ख्रिसमस आणि नव वर्षानिमित्त सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळं दराची तुलना करता येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात ४ जानेवारीपासून व्यवहार सुरु होतील. तसंच भारतीय मध्यमांनी चीनमध्ये दाखवला त्याप्रमाणात कोरोना उद्रेक नसल्याची चर्चाही आता जोर धरु लागली. तर काही जाणकारांच्या मते, जानेवारीत चीनचे नववर्ष संपल्यानंतर येथील बाजारातून कापसाला मागणी वाढू शकते. म्हणजेच यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढण्यास मदत होईल. देशातही जानेवारीच्या मध्यापर्यंत बाजारातील कापूस आवक जास्त असते. त्यानंतर कापूस विक्री कमी होते. त्यामुळं जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कापूस बाजारातील सर्व चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर कापूस दरात सुधारणा होण्यास सुरुवात होईल, असा अंदाजही कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


काय राहील दरपातळी?


कापूस बाजारातील चित्र स्पष्ट होण्यास दोन ते आठवडे लागतील. तोपर्यंत शेतकऱ्यांनी बाजारातील आवक मर्यादीत ठेवल्यास किंवा आवश्यक नसेल तर कापूस विक्री टाळल्यास बाजार जास्त तुटणार नाही. तसंच सध्या बाजारात कापूस दराविषयी काही चुकीची माहिती पसरविली जात आहे. त्यास बळी पडू नये. मात्र सध्या ज्या शेतकऱ्यांना कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही, त्यांनी या काळात किमान ८ हजार रुपये दराचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाही. तर जानेवारीनंतर कापसाला सरासरी किमान ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker