मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याची दुरुस्ती करून शेतीसाठी पाणी सोडा
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230105_163722-264x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230105_163722-264x300.jpg)
आ. धनंजय मुंडे यांची मागणी
बीड व लातुर जिल्ह्याची मुख्य जलवाहिनी असलेल्या मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या देखभाल दुरुस्ती चे काम त्वरीत करुन या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आ. धनंजय मुंडे यांनी केली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/manjara-dam-beed-a_202210896605-300x225.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/manjara-dam-beed-a_202210896605-300x225.jpg)
या संदर्भात मांजरा धरणावर नियंत्रण ठेवणा-या पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्र. १ व अधिक्षक अभियंता पाटबंधारे विभाग लातुर यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड व लातूर या दोन जिल्ह्यांची जलवाहिनी असलेले मांजरा धरण हे मागील वर्षे प्रमाणे याही वर्षी पूर्ण क्षमतेने भरलेले असून या धरणातून जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई व केज या दोन तालुक्यातील आवाड शिरपुरा, नायगाव, सौंदना, इस्थळ, आपेगाव, धानोरा (बु.) कोपरा अंजनपुर, देवळा, पाटोदा, समदापुर, अकोला, मुडेगाव, सुगाव, तडोळा आदी गावांतील सुमारे दहा हजार ५५८ हेक्टर क्षेत्र है ओलिता खाली येते. हा संपूर्ण भाग अत्यंत सुपीक असून या पाण्याच्या भरोशावर या भागातील शेतकरी ऊस व तत्सम रब्बी हंगामातील पिके घेतात.
रब्बी हंगामामध्ये डिसेंबर महिन्यातच मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडणे अपेक्षित असून अद्याप या कालव्याची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याने तसेच कालवा सल्लागार समितीची बैठक वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांना अद्याप डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/orig_new-project-23_1657821518-1024x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/01/orig_new-project-23_1657821518-1024x1024.jpg)
या भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागले असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी कळवले असून ऊसाला
देखील दोन आठवड्यांच्या आत पाणी न मिळाल्यास उसाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी व नैसर्गिक गरज लक्षात घेत सदर कालव्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण केली जावीत, धानोरा बुद्रुक येथील लोखंडी पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण केले जावे व डाव्या कालव्याद्वारे नियमित सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात अशी मागणी आ. धनंजय मुंडे यांनी केली आहे.