बॅंकेच्या इमारतीतच कार्यालय थाटलेल्या संघटनांना काढले बाहेर; कर्मचाऱ्यांनी नोंदवला निषेध


महाबँक व्यवस्थापनाने गेल्या पाच दशकांपासून संघटनेकडे बॅंकेच्या इमारतीत असलेल्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर येथील कार्यालयातून संघटनेला जबरदस्तीने बाहेर काढले. यांचा निषेध म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्रातील राज्यभरातील कर्मचा-यांनी १६ जानेवारी रोजी लाक्षणिक संप करून निषेध नोंदवला.
या निषेधार्थ हा लाक्षणिक संप पुकारला होता . या संपाची दखल न घेतल्यास नजीकच्या काळात संघटनेच्या वतीने संपाची मालिका सादर केली जाऊ शकते अशी माहीती ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्प्लाईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी
देविदास तुळजापूरकर यांनी एक प्रसिध्दी – पत्रक काढून दिली आहे.
एआयबीईए ही संघटना महा बँकेत मान्यता प्राप्त, बहुमतातील संघटना म्हणून गेल्या साठ वर्षांपासून काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेला बॅंक व्यवस्थापनांनी इतर सर्व बॅंकांप्रमाणे ही कार्यालये दिली होती. मात्र संघटना रचनात्मक गतिविधीचा भाग म्हणून व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांवर टिका करते ती टीका विद्यमान व्यवस्थापनाने वैयक्तिक घेऊन हेतुत: हे पाऊल उचलले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राचे मराठवाडा विदर्भ पुणे नगर मुंबई सोलापूर येथील शाखा कार्यालयातील कर्मचारी 16 जानेवारी रोजी एक दिवसाच्या संपात सहभागी झाले होते .
संघटनेच्या माध्यमातूनच बँकांच्या हिताचे रक्षण होते, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघटना काम करते तसेच बॅंकेचे ठेवीदार, ग्राहक यांच्या रक्षणासाठी देखील सतत काम करत आली आहे. बॅंकेने जेव्हा चूकीची कर्ज मंजूर केली तेंव्हा संघटनेने सतर्कता राखत व्हिसल ब्लोअर चे काम करुन त्याला अटकाव घालायचा प्रयत्न केला म्हणूनच कींगफीशरच्या विजय मल्या यांच्या तावडीतून ही बॅंक वाचू शकली.
संघटनेचा एक प्रतिनिधी बॅंकेच्या संचालक मंडळावर नेमला जातो . तो गेली सहा वर्षांपासून नेमला गेलेला नाही ज्यामुळे बॅंक व्यवस्थापन आपल्या हातातील सत्तेचा वापर करत कर्मचारी आणि संघटना यांच्या बाबत मनमानी निर्णय घेत आहे .
बॅंक व्यवस्थापनाच्या या धोरणांच्या विरोधात 16 जानेवारी चा हा संप असून अंबाजोगाई शाखा आणि आसपासच्या शाखेतील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन अंबाजोगाई शाखेसमोर निदर्शने केली अशी माहिती संघटनेच्या जाॅईंट सेक्रेटरी कॉम. सुभाष ताटे यांनी दिली.
यावेळी अंबाजोगाई , लोखंडी सावरगाव , पोहरेगाव शाखेचे सर्व कर्मचारी तसेच अनेक निवृत्त महा – बँक कर्मचारी सदस्य आवर्जून उपस्थित होते.