मराठवाडा विभागातील लातूर व बीड जिल्ह्यात प्राधान्याने कृषि संस्कृतीशी निगडित असलेल्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या महत्त्वाच्या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मोठे आणि व्यापक प्रमाणात केलेली वृक्ष लागवड तसेच वृक्ष संवर्धनाची सातत्यपूर्ण व अखंडितपणे केलेली यशस्वी कामगिरी या कृषि व पर्यावरणातील बहुमोल कार्याची दखल घेऊन, कृषि महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांना शनिवारी मध्य आणि पश्चिम भारतातील सर्वांत मोठे माध्यम समूह असलेल्या नवभारत – नवराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा ‘मराठवाडा आयकॉन’ने एका विशेष सन्मान सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. डॉ.ठोंबरे यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
शनिवार, दिनांक ३ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल अजंता ॲम्बेसिडर या अलिशान हॉटेलच्या सभागृहात आयोजित या विशेष सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.संजयजी शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा मंत्री ना.अतुलजी सावे, आमदार विक्रमजी काळे, नवभारत वृत्त समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए.श्रीनिवास, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका आयुक्त जि.श्रीकांत या मान्यवरांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत डॉ.ठोंबरे यांना ‘मराठवाडा आयकॉन’ हा प्रतिष्ठेचा सन्मान देऊन गौरविण्यात आले.
डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांचे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या महत्त्वाच्या कृषि क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच पर्यावरण संवर्धन यासारख्या विविध क्षेत्रात सातत्यपूर्ण उल्लेखनीय, विधायक कार्य आहे. समाजहित व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्यरत असलेले एक अभ्यासू, मेहनती व्यक्तीमत्व म्हणून डॉ.ठोंबरे यांची राज्यासह देशात सर्वदूर ओळख आहे. ‘वाळवंटातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती..!’ या सुप्रसिद्ध कवी बा.भ.बोरकरांच्या काव्यपंक्ती सार्थ ठरविणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब माणिकराव ठोंबरे हे होय. डॉ.ठोंबरे यांची एक शिस्तप्रिय, कार्यकुशल, कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख आहे.
सर्व वयोगटातील सहकार्यांना सोबत घेऊन जाण्याचे त्यांचे दृष्टे नेतृत्व व कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. शिस्तप्रिय, एक उत्तम प्रशासक, समन्वयक, व्यवस्थापक म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे. बीड जिल्ह्यातील उंदरी (ता.केज) सारख्या आडवळणाच्या एका गावखेड्यात, एका सामान्य परंतु, कृतीशिल विचारांच्या शेतकऱ्याच्या घरी जन्मलेला एक युवक, आपल्या मनात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उरात एक ध्येय बाळगून, सोबत आई – वडिलांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन शिक्षणासाठी बाहेर पडले. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून कृषि पदवी घेऊन मुहूर्तमेढ रोवली व पुढे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या विषयात आचार्य पदवी घेऊन त्यावर गुढी उभारली.
कृषि विद्यापीठात ३० वर्षांच्या सातत्यपूर्ण सेवेत त्यांनी पदांचे एकेक शिखर पादाक्रांत केले आहे. आज ते लातूर येथील कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता या पदाची धुरा समर्थपणे पेलत आहेत. तत्पूर्वी ते कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई येथे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य याच पदावर कार्यरत असताना त्यांनी अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. कृषि विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याबरोबरच त्यांनी महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, अटल घनवन वृक्ष लागवड, योगापार्क, ऑक्सिजन हब इत्यादी संकल्पना त्यांनी राबवल्या. परिसरात व गावशिवारात अत्यंत अल्पावधीत एकूण २ लक्ष विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केले आहे. त्याचबरोबर कृषि महाविद्यालयासमोर अत्यंत देखणे आणि रमणीय (गार्डन) बगीचा निर्माण करून महाविद्यालयाची शोभा वृद्धिंगत केली आहे. संस्थेशी विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ, विचारवंत, व्याख्याते, कवी, समाजसेवक यांचे वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घडवून संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते जोडले व अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालय तसेच लातूर येथील कृषि महाविद्यालय खऱ्या अर्थाने लोकाभिमुख केले.
कृषि व कृषिपूरक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी देशी गोवंश, म्हैसवर्ग व शेळी – मेंढी पालनात विशेष संशोधन करून ते शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरले आहे. राष्ट्रीय स्तरांवर शेतकरी, पशुपालक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी मेळावे व चर्चासत्रे यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. तसेच दूरदर्शन, आकाशवाणी, नियतकालिके, दैनिके याद्वारे जनजागृती करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सातत्याने भरीव योगदान दिले आहे.
त्यांच्या या समाजोपयोगी, भरीव कार्याची दखल घेऊन आत्तापर्यंत डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांना अनेक विभागीय व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय पुरस्कार, भारतीय कृषि संशोधन परिषदेचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, राष्ट्रीय स्तरांवरील उत्कृष्ट समीक्षक पुरस्कार, पशु संवर्धनासाठीचा जीवनगौरव पुरस्कार, पर्यावरणाचा सुंदरलाल बहुगुणा पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, संजीवनी कृषि पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शिक्षण तज्ञ पुरस्कार, वृक्ष संवर्धनाचा प्रभावती नागरी गौरव पुरस्कार, श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी’ यांच्या वतीने दिला जाणारा ‘कृषि माऊली’ अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
प्राचार्य डॉ.ठोंबरे यांना सुमारे ३० वर्षांचा शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याचा प्रदिर्घ अनुभव आहे. डॉ.ठोंबरे यांचे आचार्य पदवीच्या ११ विद्यार्थ्यांना व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४९ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले आहे. तसेच त्यांची आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून ११५ संशोधनपर लेख व विविध ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नवभारत-नवराष्ट्र माध्यम समूह नेहमीच नव्या कतृत्वाचे वेध घेत समाजहित आणि समाजाच्या प्रगतीसाठी अलौकिक करून दाखविणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करते.
डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांना ‘मराठवाडा आयकॉन’ने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.इंद्र मणी, कुलसचिव संतोष वेणीकर, शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, माजी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, डॉ.मधुकरराव गायकवाड, पं.उद्धवबापू आपेगावकर, रमेशराव आडसकर, नंदकिशोर मुंदडा, राहुल सोनवणे, डॉ.अनिलकुमार भिकाने, डॉ.सोमनाथ रोडे, डॉ.दिगंबर चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, मुक्त पत्रकार रणजित डांगे, प्रख्यात कवी राजेश रेवले, सुप्रसिद्ध गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे, साहित्यिक राजेंद्र रापतवार आदींनी अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मराठवाडा आयकॉन’ करीता निवड केल्याबद्दल आभार मानत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना डॉ.ठोंबरे यांनी सांगितले की, दिवसेंदिवस वाचकप्रिय होत असलेल्या आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात या मध्य आणि पश्चिम् भारतातील सर्वांत मोठे माध्यम समूह असलेल्या नवभारत-नवराष्ट्र वृत्त समूहातर्फे ‘मराठवाडा आयकॉन’ चे लातूर व बीड परिसरातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. दैनिक ‘नवराष्ट्र’ने नेहमी आपल्या शहराच्या, जिल्ह्याच्या, विभागाच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले आहे, त्याच अनुषंगाने ज्या-ज्या लोकांनी मराठवाड्याच्या विकासासाठी समर्पित भावनेने आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान दिले अशा मराठवाड्यातील विकासरत्नांच्या यशोगाथा आणि गौरव गाथा देण्याचा प्रयत्न नवराष्ट्रने सातत्याने केला. या सन्मानासाठी माझी निवड केल्याबद्दल नवभारत-नवराष्ट्र वृत्त समूहाचे जाहीर आभार.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.