महाराष्ट्र

पितृपक्ष पंधरवड्यात तर्पणाचा “घास” घेणारा कावळा गायब!

अनेकांच्या नजरा कावळ्यांकडेच!

हिंदु धर्म संस्कृतीत पितृपक्ष पंधरवाड्याला विशेष महत्त्व आहे. आपल्या घरातील पुर्वजांचे तिथी नुसार पुजन करुन त्यांना भोजन देणे (तर्पण) आणि या भोजनाचा घास कावळ्याने घेणे या पारंपारिक पध्दतीला ही वेगळा संदर्भ आणि धार्मिक महत्त्व आहे. अशा या महत्त्वपूर्ण पंधरवाड्यात पुर्वजांना देण्यात येणाऱ्या भोजनाचा घास घेणारा कावळा मात्र या अतिवृष्टीच्या तडाख्यात दिसेनासा झाला आहे. अतिवृष्टीमुळे लुप्त झालेल्या या कावळ्याने पितृपक्ष पंधरवाड्यात भल्याभल्यांची झोप उडविली आहे. तर अनेकांच्या नजरा कावळ्यांकडेच लागलेल्या आहेत.


प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पुर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात असत. सातवाहन राजांनी शालिवाहन शक सुरू केले. ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होते. त्यामुळे हिंदु नववर्ष चैत्र पाडव्याला सुरू केले जाते. मात्र, महालय काळ बदलला गेला नाही. तो भाद्रपदाचा दुसरा आठवडाच राहिला. ती प्रथा शतकानुशतके जोपासली गेली आहे. शतकानुशतके चालत आलेल्या या पितृपक्षाचे महत्त्व व मान्यता यांविषयी ची माहिती आपण येथे जाणून घेण्याचा प्रयत्न करु या.
पितृपक्षास श्राद्धपक्ष ह्या नावाने सुद्धा ओळखण्यात येत असून हिंदू धर्मात त्यास विशेष महत्व देण्यात आले आहे. विक्रम संवत्सरानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षास पितृपक्ष ह्या नावाने संबोधण्यात येते. लोक ह्या पंधरवड्यात आपल्या दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांततेसाठी श्राद्ध तर्पण विधी करतात. ज्यात गाय, कुत्रा व कावळा ह्यांना विविध पदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. असा समज आहे की गाय, कुत्रा व कावळ्यास खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरां पर्यंत पोचतात व त्यांच्या अतृप्त आत्म्याची तृप्ती झाल्याने त्यांना विविध प्रकारे शांती मिळते. धार्मिक कथेत सुद्धा असे सांगण्यात आले आहे की, देवपूजा करण्यापुर्वी प्रत्येक व्यक्तीने पितरांची पूजा करावयास हवी. जर पितर खुष असतील तर देव सुद्धा खूषच होतील. ह्या मुळेच भारतीय संस्कृती व समाजात राहणारी लोक स्वतःच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विविध मार्गाने आदर करतात व त्यांचा मान टिकवून ठेवतात.


पितृपक्षात आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी त्यांना श्राद्ध तर्पण करण्यात येते, ज्यास श्राद्ध कर्म असे संबोधण्यात येते. पितरांच्या मृत्यू तिथीनुसार प्रतिपदा ते अमावास्या ह्या दरम्यान श्राद्ध कर्म करण्यात येते. जर एखाद्या पितराची मृत्यू तिथी माहित नसली तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावास्येस तर्पण करता येते. ह्या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ शकते. असा समज आहे की मृत्यू नंतर ज्या पितरांचे नियमानुसार श्राद्ध कर्म होत नाही त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही.
पितृपक्षा मागे ज्योतिषीय कारणे सुद्धा आहेत. ज्योतिष शास्त्रात पितृ दोष खुपच महत्वाचा समजण्यात येतो. एखादी व्यक्ती जेव्हा यशाच्या जवळपास जाऊन ऐनवेळी अनाकलनीय कारणास्तव हाती आलेले यश गमावून बसते किंवा तीला संततीप्राप्तीत समस्या असते किंवा संपत्तीचा नाश होतो इत्यादी समस्या भेडसावत असतात तेव्हा तज्ञ ज्योतिषी त्या व्यक्तीच्या कुंडलीत पित्रदोष आहे का हे बघतात. असा दोष असता जातकास अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पितरांच्या शांतीसाठी पितृदोष विधी करण्याची आवश्यकता भासते. असे जोतिष शास्त्रात सांगितले आहे.
पितृपक्ष सामान्यतः सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येत असतो. विक्रम संवत व इतर भारतीय पंचांगानुसार भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील प्रतिपदा ते अमावास्या पर्यंत पितृपक्ष असतो.
हिंदु शास्त्रानुसार पितृपक्षास श्राद्धकर्मा व्यतिरिक्त विशेष असे महत्व सुद्धा आहे. ब्रह्म पुराणानुसार तर्पण (पितरांना भोजन व जल अर्पण करणे) व दान (गरीब व गरजवंतास दान केल्याने पितर संतुष्ट होतात) करण्यास विशेष महत्व आहे.


पितृपक्षाला हिंदु धर्म संस्कृतीत असलेल्या या महत्वामुळे या पंधरवड्यात आपल्या पुर्वजांना भोजन व जल अर्पण करणे आणि यांचा एक घास कावळ्याने घेणे याला विशेष महत्त्व आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झाडांवर घरटे करुन राहणा-या कावळ्यांसह सर्वच पक्षांचे घरटे जमीन दोस्त झाले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत नंतर दररोज सहज दिसणारा कावळा आता नेमका या पितृपक्ष पंधारवाड्यात अचानक दिसेनासा झाला आहे. सगळीकडे पाणीच पाणी दिसत असल्यामुळे हा कावळा नेमका या पितृपक्ष पंधारवाड्यातच लुप्त झाला असून तर्पण विधी करणा-याच्या नजरा मात्र आता कावळ्यांच्या शोधात फीरत आहेत.
असे असले तरी भारतात असंख्य अशी पवित्र स्थळे आहेत जेथे जाऊन आपण पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून त्यांची श्राद्धकर्म विधी करू शकता. हिंदु धर्माच्या मान्यतेनुसार वाराणसी, गया, केदारनाथ, बद्रीनाथ, नाशिक, रामेश्वरम, यमुनानगर, चाणोद व इतर अनेक पवित्र स्थळे आहेत कि जेथे पितृ तर्पण विधी करण्यात येते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker