प्रबोधन

पळस फुलला…!!

पळस फुलणं म्हणजे नेमकं काय असतं याचा प्रत्यय दोन दिवसांपुर्वी अंबाजोगाई -केज तालुक्यांच्या सीमा रेषावरील माळरानातील शिवारातुन फिरताना आला. पळसाची अनेक झाडं या माळरानात पहायला मिळाली. एका ठिकाणी तर एका शेजारी एक अशी चार झाडं ती ही चक्क लालभडक फुलांनी लगडलेली पहावयास मिळाली. उन्हाचा चटका जाणवत असतांनाच या लालभडक रंगांनी फुललेल्या पळसाच्या झाडाकडे बघतांना, त्यांचे फोटो काढतांना वेळ कसा निघून गेला समजलेच नाही.
तसं पहायला गेलं तर पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. पुर्वी सर्रास आणि आता काही प्रमाणात जेवण्याच्या पत्रावळीसाठी याच्या पानाचा वापर होतो. महाराष्ट्रात हिवाळा संपत आला की या झाडांची पानगळ सुरू होते आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीपासुनच पळसाची ही झाडं संपुर्ण लाल फुलांनी लागुन जातात. पानगळी नंतर या झाडाला आलेल्या फुलांचा आकार एखाद्या दिव्याच्या ज्योती प्रमाणे असतो आणि हे संपुर्ण झाड लाल फुलांनी लागडुन गेले की ते दुरुन वणवा पेटल्यागत दिसतं. याच मुळं या झाडाला इंग्रजीत “फॉरेस्ट फायर” किंवा “प्रेम ऑफ व फॉरेस्ट” असं म्हणतात!
पळसाचं झाडं ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. या झाडाच्या पान, फुले, बिया, मुळं यांचा विविध आजारांवर उपयोग केला जातो.
पळसाच्या झाडाची पाने, फुले, बिया, मुळे आणि डिंक या घटकांना आयुर्वेदात खुप महत्व आहे. या वनस्पतीच्या विविध भागामध्ये बट्रीन, आयसोबट्रीन, कोरीओपोसीन, सल्फुरेन इ. ग्लायकोसाईड असतात.
या वृक्षाचा पानाचा उपयोग द्रोण, पत्रावळी, बिडी निर्मितीसाठी, फुलाचा उपयोग रंग निर्मितीसाठी व मुळाचा वापर धागे बनविण्यासाठी केला जातो. त्यापासून दोरखंडे बनविली जातात.


पळसाची फुले रात्री पाण्यात ठेवून, सकाळी गाळून त्यात मीठ अथवा खडीसाखर मिसळून दम्यावर देतात.
बियापासून काढलेले तेल रंगाने पिवळे असून, त्याचा वापर विविध औषधामध्ये केला जातो.
अस्थिभंगात साल, फुले व डिंक यांचा काढा दिल्यास मोडलेले हाड लवकर सांधले जाते. खोडावरील लालसर रंगाचा डिंग आणि बियांचे चूर्ण पोटातील जंतू, कृमी पाडण्यासाठी केला जातो.
महिलांमधील मासिक पाळीच्या विकारात डिंकाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. यास ‘कमरकस गोंद’ असेही म्हणतात. पळसाच्या बियाचे चूर्ण लिंबाच्या रसात मिसळून खरुज, गजकर्ण, इसब व अन्य त्वचारोगांवर लावतात. मुत्राशयाचे विकार, किडनीचे विकार इ.मध्ये फुलाचा वापर केला जातो. असे आयुर्वेदात सांगितले आहे.
पळसाच्या झाडाला तसं प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळं असं स्थान आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून सकाळी मॉर्निंग वॉकला शहराबाहेर पडलो की आज ही लाल भडक फुलांनी फुललेल्या पळसाची अनेक झाडे माझी नजर सुखावून टाकतात. विशेषतः होळी आणि धुलिवंदन जवळ आले की हा फुललेला पळस मला अधिक अस्वस्थ करुन टाकत माझ्या बालपणीच्या आठवणी अधिक ताज्या करतो.
आम्ही भावंड लहान असतांना माझे वडील (आण्णा) बी.एड., डी.एड. काँलेज परीसरातील “तिरपट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परीसरातील आंब्याच्या बागामध्ये आपला हिस्सा घेत असत. त्यामुळे या बागेतील झाडांना कै-या लागल्यापासूनच या परीसरात आमची ये-जा सुरु असायची. या परीसरात पळसाची झाडे खुप असत, अजूनही आहेत. या पळसाच्या झाडांची आणि माझी ओळख माझ्या आजीने करुन दिली. एक तर तिला पत्रावळी करण्यासाठी या झाडांची पाने घ्यावी लागत असत आणि फुलांचाही उपयोग तिला माहीत होता. होळी सणाच्या अगोदर अंब्यांच्या बागेत चक्कर मारुन झाली की आम्ही या पळसाच्या झाडाखाली पडलेली लाल फुले गोळा करुन घरी आणत असू. ही पळसाची फुले मोठ्या प्रमाणात गोळा झाली आणि होळी दोन दिवसावर आली की आम्ही ही फुले जुन्या माठात, बकेटीत भीजत ठेवत असू… फुले दोन दिवस पाण्यात भिजली की त्याचा मस्तपैकी लाल रंग तयार व्हायचा आणि मग आम्ही धुळवडीला या पळसाच्या फुलांपासून तयार झालेला रंग खेळायचो. दोन दिवसांपूर्वी मी या भागात राहणारे माझे मित्र रमेश ठाकुर यांच्या शेतात फिरायला आलो आणि नेहमीप्रमाणे तांबड्या फुलांनी लगडलेल्या या पळसाच्या झाडांनी माझे लक्ष वेधून घेतले. होळीच्या पार्श्वभूमीवर माझ्या लहानपणीच्या पळसाच्या झाडाशी लगडलेल्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणीचे माझे मित्र. वडीलांचा धाक, आई-आजीची पाठराखण आणि भावंडांचा सहवास, मस्ती सर्वकांही झर्रकन डोळ्यासमोरुन तरळून गेले. तांबड्या फुलांनी फुललेलं पळसाचे झाड माझ्या लहाणपणीच्या आठवणी फुलवून गेलं…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker