पत्रकारावरील हल्ल्या संदर्भात अंबाजोगाईत निदर्शने; पत्रकार संरक्षण कायद्याची केली प्रतिकात्मक होळी!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230817-WA0258-1024x461.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230817-WA0258-1024x461.jpg)
पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात होत असलेली कुचराई याच्या निषेधार्थ अंबाजोगाई येथील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न करणा-या राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करीत पत्रकार संरक्षण कायद्याची प्रतिकात्मक होळी केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230817-WA0264-1024x461.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230817-WA0264-1024x461.jpg)
दि 17 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वा. अंबाजोगाई नगर परिषद कार्यालय परिसरातुन उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न करणा-या, पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्यावर र्निबध आणणा-या, पत्रकारांवर हलृले करणा-या गावगुंडांनी पाठीशी घालणा-या राज्य शासनाचा निदर्शने करुन तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230817-WA0257-1024x461.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230817-WA0257-1024x461.jpg)
सदरील निदर्षनानंतर हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर नेत या ठिकाणी पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यास अर्वाच्च शिविगाळ करुन चार गुंडांनी हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही. राज्यातही जेथे जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. 2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले. त्यांना शिविगाळ केली गेली किंवा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230817-WA0229-1024x768.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230817-WA0229-1024x768.jpg)
त्यानंतरही केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लावला गेला. कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कायद्याचा धाक उरला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे. पत्रकारावर हल्ले होऊन जर त्या कायद्याखाली गुन्हा दाखल होत नसेल किंवा त्याची कडक अंमलबजावणी होत नसेल तर तो कायदा काय कामाचा? अशा संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, पत्रकार हल्ला नियंत्रण समितीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, अविनाश मुडेगावकर, पत्रकार वैद्यकीय कक्षाचे प्रमुख डॉ. राजेश इंगोले व इतरांनी व्यक्त केल्या.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230817-WA0243-1024x472.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230817-WA0243-1024x472.jpg)
पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे, हल्लेखोरावर तात्काळ गुन्हे दाखल झालेच पाहिजेत , पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकारांना लिखाण स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे या व इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या प्रसंगी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले. या सर्व प्रक्रियेत मराठी पत्रकार परिषद, पत्रकार संघ, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, डिजिटल मेडिया पत्रकार संघाचे सर्वं सदस्य उपस्थित होते.