नालंदा अकादमीच्या वतीने प्राचार्य डॉ. कांबळे व प्रा. धाकडे यांचा सत्कार


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी महू, मध्यप्रदेश सरकार यांच्या वतीने दिला जाणारा व राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा “राष्ट्रीय भिमरत्न पुरस्कार – 2023” अंबाजोगाई येथील ज्येष्ठ साहित्यिक, प्रवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक व आंबेडकरी विचाराचे भाष्यकार माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे आणि येथील सामाजिक कार्यकर्ते, योगेश्वरी महाविद्यालयातील सेवानिवृत्त ग्रंथपाल आणि ग्रंथ वाचक चळवळ जागृत ठेवण्यासाठी सतत पुढाकार घेणारे प्रा. डि. जी. धाकडे यांचा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीत डॉ.आंबेडकर नगर, महू, मध्यप्रदेश येथे एका अतिभव्य सोहळ्यात दस्तूरखुद्द मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी प्रदान करण्यात आला.


या विशेष कार्यक्रमात मध्यप्रदेशचे महामहीम राज्यपाल मंगूभाई सी.पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मा. शिवराजसिंह चौहान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी महू (मध्यप्रदेश) चे अध्यक्ष भदन्त प्रा.सुमेधबोधी महाथेरो (राज्यमंत्री दर्जा प्राप्त), सचिव राजेश वानखेडे या अतिविशेष मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार माजी प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे आणि प्रा. डि.जी. धाकडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.
सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल नालंदा अकादमीच्या वतीने अध्यक्ष चंद्रशेखर वडमारे व योगेश्वरी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. पंडीत कराड यांनी त्यांचा सत्कार करुन आज पर्यंत केलेल्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.