महाराष्ट्र

दुख: भरे दीन बीते रे भैय्या, अब सुख आयो रे, रंग जीवन में नया लायो रे!

काल रक्षा बंधनांचा हा फोटो पाहून १९५७ साली निघालेल्या मदर इंडिया या चित्रपटातील “दुखः भरे दीन बीते रे भैय्या, सब सुख आयो रे, रंग जीवन में नया लायो रे” या गाण्याची आठवण झाली. शकील बुदायणी या गीतकाराने लिहिलेल्या या गीताला स्वरबध्द केले ते महमंद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या बहारदार स्वरांनी तर संगीताचा साज चढवला तो नौशाद यांनी!


एका बंजर जमिनीवर अहोरात्र मेहनत करून डौलाने उभ्या राहिलेल्या पिकांच्या पार्श्वभूमीवर चित्रबद्ध केलेलं मदर इंडिया या चित्रपटातील या गीताला आज ६६ वर्षे पुर्ण होत आली असली तरी हे गाणे ऐकताना सहजच आठवणींचे अनेक पदर उलगडत जातात. रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर स्वतः कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट वर टाकलेला हा फोटो सुध्दा मुंडे परिवारातील अनेक आठवणींचे पदर उलगडतो आहे.
कोणाचीही दृष्ट लागावी असे २० वर्षांपुर्वी असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या घराला कोणाची नजर लागेल आणि भावाभावात एवढे वैर निर्माण होईल असे भाकीत त्या काळी कोणी केले असते तर ते तेंव्हा कोणालाही खरे वाटले नसते. पण काळाचा महिमा अगाध आहे.


राम लक्ष्मणा सारखे प्रेम असलेल्या भावांचे कुटुंब विभक्त झाले, प्रचंड राजकीय वैमनस्य निर्माण झाले. या राजकीय वैमनस्याची कुटता पुढच्या पिढीत ही रुजल्या गेली. जवळपास १०-१५ वर्षे ही कुटुता सतत रुजत रहावी यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले! पण रक्ताचे नाते वेगळेच असते याचा प्रत्यय ही अधुन मधुन यायचा!
दैनिक लोकमतच्या वतीने देण्यात येणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात बहिण भावांनी घेतलेली ती प्रेमळ गळाभेट, भाच्चीच्या विवाह सोहळ्यात बॅण्डच्या तालावर धरलेला ठेका, डॉ. तात्याराव लहाने यांच्या मुंबई येथील कै. रघुनाथ नेत्रालयाच्या उद्घाटन सोहळ्यातील बहिण भावाची डोक्यावर मारलेली ती प्रेमळ टपली, दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भावाने बहिणीच्या घरी जाऊन घेतलेली भेट, अशा किती तरी प्रसंगातुन राजकीय वैमनस्य असलेल्या या बहिण भावाच्या नात्यातील एक आगळा वेगळा ओलावा अनेकांनी पाहिला! पाहणा-यांचे डोळे दिपून गेले, अनेकांनी समाधानाचे सुस्कारे ही सोडले. हे क्षण प्रत्यक्ष अनुभवणा-या बहिण भावांनी या परमसुखाची कुठेही जाहीर वाच्यता केली नसली तरीही त्यांच्या अंर्तमनाला हे परमसुखाचे क्षण किती भावले असतील हे आपल्या कल्पनेच्या ही पलिकडे आहे!


रक्षा बंधन हा सण बहीण भावाचे नाते दृढ करणारा, बहिणींना त्यांच्या संरक्षणाची हमी देणारा, तिच्या सुखाच्या-दुखा:घ्या क्षणी सतत तिचीच पाठराखण करण्यासाठी उभा राहण्याची हमी देणारा सण म्हणून साजरा केला जातो. बहिण भावातील पवित्र नाते संबंध दृढ करणा-या या सणाचे औचित्य साधत अनेक वर्षांनंतर आपली थोरली बहीण भाजपाच्या राष्ट्रीय सचिव सौ. पंकजा, आणि लाहण्या बहिणी खा.डॉ. सौ. प्रितम आणि ही ऍड. यशश्री यांच्या कडून ओवाळून घेऊन त्यांच्या सतत पाठीशी उभी राहण्याची हमी देणारा आपल्या काकू आदरणीय प्रज्ञाताईं सोबतचा हा फोटो आणि सोबतची चलचित्र फीत या बहिण भावाच्या एकीचा संदेश देवून जाते.
गेली वर्षभरापासून या बहिण भावाच्या नात्यात होत जाणा-या सकारात्मक बदल आपण सर्वच जण पहातो आहोत, अनुभवतो आहोत. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झालेल्या या काळात गेली अनेक वर्षे अस्थिरतेची झळ सोसणारे हे दोन कुटुंब पुन्हा नव्याने एकत्र आले तर आनंदच आहे की! म्हणूनच काल दस्तुरखुद्द कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी स्वतः आपल्या फेसबुक वॉल आणि व्टिटरवर टाकलेला हा फोटो पाहून अचानक मदर इंडिया या चित्रपटातील

” दुखः भरे दीन बीते रे भैय्या
अब सुख आयो रे
रंग जीवन में नया लायो रे…”


या गाण्याची सहज आठवण आली!

@: सुदर्शन रापतवार / अंबाजोगाई

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker