गणेशाचे स्त्रीशक्ती रुप “विनायकी” आणि अंबाजोगाई…!


गणेश… गणेशानी
गजानन… गजनीनी
गजमुख….गजमुखी
गणराय… गणेश्वरी
विनायक… विनायकी
विनायकी…. गणेशाचा स्त्री अवतार म्हणजे विनायकी, की विनायकी ही स्वतंत्र देवता आहे हा वाद पुराणा पासुनच सुरु आहे. विनायकी ही गणेशासारखीच दिसते, मात्र ती स्त्री वेषभुषेत आहे म्हणून तिला गणेशाचा स्त्री अवतार म्हणून संबोधतात. पण नेमकी विनायकी ही देवता नेमकी कोण आहे आणि तिचा अंबाजोगाईशी काय संदर्भ आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करु.
श्री गणेशाच्या स्त्री अवतारासच विनायकी म्हणून संबोधतात. सुख-समृध्दी देणारी आणि मंगलकरणारी स्त्री वेषातील गणेश देवता असणाऱ्या विनायकी बध्दल तशी खुप कमी लोकांना माहिती आहे. पुराणकाळातील अनेक ग्रंथांमध्ये श्री गणेशाच्या या स्त्रीरुपी वर्णनाची माहिती दिली आहे. गणेशाच्या या स्त्रीरुपी अवतारास अनेकजण गणेशानी, गजनीनी, गणेश्वरी, गजमुखी, विनायकी आणि इतर अनेक नावाने ओळखतात. भारतातील तामिळनाडू, मदुराई या भागात अनेक ठिकाणी श्री गणेशाची या स्त्रीरुपात पुजा केली जाते.


“मत्सपुराण” आणि “विष्णु धर्मोत्तर पुराण” या अतिप्राचीन धर्मग्रंथात या संदर्भात एक दंतकथा सांगण्यात आली आहे. त्याकाळी आंदोक नावाच्या राक्षसाने देवी पार्वतीच्या अपहरणाचा कट रचून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा आंदोक राक्षसाचा हा डाव उलटून लावण्यासाठी भगवान शंकराने आंदोक राक्षसाचा वध करण्यासाठी वार केलेल्या त्रिशुलाने माता पार्वती जखमी झाल्या. या जखमेतुन माता पार्वतीच्या शरीरातून निघालेले रक्त जमिनीवर पडले व ते दोन भागात विभागल्या गेले. ते दोन विभाग म्हणजे एक स्त्री चा आणि दुसरा पुरुषाचा अंश. या दोन्ही अंशातुन वैनायकी ची निर्मिती झाली असे सांगितले जाते.
विनायकी, गणेशीनी किंवा गजानिनी अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणेशाच्या स्त्री रुपाबद्दल या व्यतिरिक्त विनायकी देवी ही पार्वती देवींची सहकारी ‘मालिनी’ आहे, असा दावा काही जाणकारांनी केलेला पाहायला मिळतो. विनायकी देवी म्हणजेच गणेशाचे स्त्री रूप किंवा ‘स्त्री शक्ती’ हे सिद्ध करणारी एक दंतकथा पुराणात पाहायला मिळते.


अंधकासुर नावाचा एक राक्षस होता. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे जमिनीवर पडणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल, अशी शक्ती त्याला प्राप्त झाली होती. अंधकासुर पार्वती देवीचे रुप पाहून अक्षरशः मोहीत झाला आणि थेट पार्वती देवीशी विवाह करण्याचा संकल्प त्याने केला. मात्र, अंधकासुराचा संकल्प पार्वती देवीने महादेवांना सांगितला. महादेव शिवशंकरांनी त्रिशूळाच्या एका प्रहाराने अंधकाचा वध केला. पण, अंधकाचं रक्त जमिनीवर पडताच अनेक अंधकासुर निर्माण झाले.
ब्रह्मदेवाने दिलेले वरदान महादेवांना समजताच त्यांचे समोर मोठा पेच निर्माण झाला. कारण निर्माण झालेल्या अंधकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या रक्तातून पुन्हा अंधकासुर तयार होत होते. रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडायला नको. तेव्हाच अंधकासुराचा कायमचा बंदोबस्त करता येईल, हा उपाय पार्वती देवीने हेरला. पार्वती देवीने ब्रह्मा, विष्णू, इंद्र अशा सर्व देवतांचे बोलावून त्या देवतांमधील स्त्री शक्तीचे आवाहन केले. इंद्राची शक्ती इंद्राणी, ब्रह्मदेवतेची शक्ती ब्राह्मणी, विष्णूची शक्ती वैष्णवी अशा विविध शक्ती धावून आल्या. गणेशाची स्री शक्ती ही प्रकटली. तीच ‘विनायकी’ किंवा ‘गणेशीनी’. या शक्तींनी मिळून अंधकाचे रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच ग्रहण केले आणि अशा प्रकारे शेवटी अंधकासुर वध झाला.


अनेक लोक गणेशानी अथवा विनायकी हीस गणेशाची पत्नी मानतात, मात्र हे सत्य नसल्याचे अनेक धर्मग्रंथात सांगण्यात आले आहे. वैनायकी ही एक स्वतंत्र देवी आहे. ती ६४ योगियां पासून निर्माण झालेला गणेशाचा स्त्री अवतार आहे. असे ही सांगितल्या जाते. काशी आणि उडिसा मध्ये अनेक ठिकाणी गणेशाच्या या स्त्री अवतारातील वैनायकी ची पुजा करण्यात येते. या वैनायकी च्या हातात युध्दात वापरण्यात येणारा परशु आणि कु-हाडी कायम असल्याचे दिसते.


१६ व्या शतकात सर्वप्रथम गणेशाच्या या विनायकी अवताराची लोकांना माहिती झाली आणि तेंव्हापासूनच या विनायकी देवतेची पुजा ही सुरु झाली. विनायकी देवीचे अर्धे शरीर स्त्री चे आणि अर्धे शरीर हे हात्तीचे (म्हणजेच गणेशाचे) आहे. श्री गणेशाच्या मुर्ती प्रमाणेच वैनायकीची ही मुर्ती बसलेली, उभा टाकलेली आणि अनेकवेळा नृत्य करीत असलेली आढळून येते. वैनायकी ही एक स्वतंत्र देवता आहे. तिचा श्री गणेशाशी काहीही संबंध नाही. फक्त तिचे रुप गणेशाप्रमाणे आहे. असे ही मानणारा एक वर्ग आहे.
या विनायकी देवीचे अंबाजोगाई आणि पाटण येथे मंदीरे असल्याची चर्चा आहे. मात्र अंबाजोगाई येथे वैनायकीचे स्वतंत्र मंदीर असल्याचा उल्लेख वा संदर्भ कोणत्याही धार्मिक ग्रंथात अथवा अलिकडील पुस्तकात आढळून येत नाही. मात्र १२ शे वर्षांपुर्वी बांधण्यात आलेल्या अंबाजोगाईची ग्रामदेवता योगेश्वरी मातेच्या पाच मजली शिखराच्या दुसऱ्या मजल्यावरील देवतांच्या रांगेत विनायकी देवतेची मुर्ती असल्याचे आजही स्पष्टपणे पहावयास मिळते.


योगेश्वरी माता मंदीराचे संपुर्ण बांधकाम हे हेमाडपंथी पध्दतीचे आहे. या मंदीराच्या बांधकामाचे वैशिष्ट्य असे आहे की, या मंदीराच्या कळसाचे बांधकाम हे इतर मंदीरापेक्षा वेगळे आहे. या पाच मजली शिखराची ऊंची ७० फुट आहे. शिखराच्या पहिल्या मजल्यावर चारही बाजूंनी रामायण महाभारतातील निवडक प्रसंग असून दुसऱ्या मजल्यावर ६४ योगीयांपैकी कांही योगीयांच्या मुर्ती कोरण्यात आल्या आहेत. याच रांगेत विनायकी देवतेची मुर्ती आणि श्री योगेश्वरी देवीचे व्दादश आवतार कोरलेले आहेत. सदरील विनायकी ची मुर्ती ही अत्यंत सालांकृत असून सोळा भुजांची आहे. तिच्या हातात गड, धनुष्य, परशु, कु-हाडी, नाग, फुल, मोदक, अक्षमाला आदि साहित्य आहे. तर तिच्या दोन्ही बाजूस सिध्दहस्त पुरुष उभा टाकलेले आहेत. तर तिसऱ्या मजल्यावरही व्दादश अवतार, चौथ्या मजल्यावर नवग्रह तर पाचव्या मजल्यावर सप्तऋषी विराजमान झालेले आहेत.


सुख-समृध्दी देणारी आणि मंगल करणारी म्हणून ओळख असलेल्या या विनायकी देवतेचा आणि अंबाजोगाईचा एवढाच संदर्भ आहे. म्हणूनच योगेश्वरी मातेचे दर्शन घेण्यापुर्वी या मंदीराच्या कळसाचे दर्शन घेण्याचा प्रघात अंबाजोगाई शहरात पुराणकाळापासून सुरु आहे.