महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता तीन दिसानंतर सुरुवात होणार आहे. केज विधानसभा मतदारसंघ हा संयुक्त महाराष्ट्र निर्मिती अगोदरच्या निजाम राजवटी पासून अस्तित्वात आहे . हैदराबाद संस्थानात हा मतदारसंघ मोमीनाबाद या नावाने ओळखला जायचा. १९५७ मध्ये निजाम राजवट संपुष्टात आली आणि १९५७ लाच महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक झाली. केज विधानसभा मतदार संघाची ही पहिली निवडणूक!
२०२४ मध्ये २० नोव्हेंबर रोजी नवीन विधानसभा अस्तित्वात येण्यासाठी मतदान होणार आहे. यावेळी पहिल्या विधानसभा निर्मितीला ६७ वर्षे पुर्ण होतील. या ६७ वर्षाच्या कालावधीमध्ये या मतदारसंघाने ९ सदस्यांना विधानसभेत या मतदा संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. या ६७ वर्षा पैकी २७ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या विभागातील मतदारांनी मुंदडा परीवाराला दिली. आता होवू घातलेल्या निवडणुकीतही मुंदडा परीवाराच्या उमेदवार सौ. नमिता मुंदडा यांचे पारडे जड असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे.
केज विधानसभा मतदारसंघाला तसे महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पुर्वीपासुनचा इतिहास आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपुर्वी मराठवाड्याचा हा विभाग निझाम राजवटीत येत होता. निजाम राजवटीत मोमिनाबाद या नावाने हा स्वतंत्र मतदार संघ अस्तित्वात होता. या मोमिनाबाद मतदार संघाचे १९५२ ते १९५७ या कालावधीत प्रतिनिधीत्व करण्याची संधी अंबाजोगाईचे व्दारकाप्रसाद चौधरी आणि बीडचे अँड. रामलिंग स्वामी यांना मिळाली. यावेळी निजाम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बी. रामकृष्ण राव तर आरोग्यमंत्री म्हणून फुलचंद गांधी हे काम पहात होते. आ. व्दारकाप्रसाद चौधरी यांच्या कार्यकाळात मोमिनाबाद येथे सुरु करण्यात आलेल्या टी. बी. मेमोरियल हाँस्पिटलचे उदघाटन फुलचंद गांधी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
१९५७ नंतर निजाम राजवट संपुष्टात आली आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत अनुसुचित जाती प्रवर्गातुन गोविंदराव गायकवाड यांना काम करण्याची संधी मिळाली.
महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम विधानसभेसाठी १९५७ साली मतदान झाले. १९५७ साली सुरु झालेल्या या प्रक्रियेला आता ६७ वर्षे पुर्ण झाली असून या ६७ वर्षाच्या कालावधीत सुरुवातीची फक्त १० वर्षेच या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना मिळाली. सर्वप्नथम १९५७ आणि १९६२ या निवडणुकीत हा मतदार संघ अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित राहिला. या
नंतर १९६७ आणि १९७२ यावर्षी हा मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारासाठी सुटला. या नंतर १९७८ साली हा मतदार संघ पुन्हा अनुसूचित जाती उमेदवारांसाठी आरक्षित राहिला. यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकी पुर्वी राज्यातील सर्वच मतदारसंघाची पुर्नरचना करण्यात आली आणि कांही नवीन विधानसभा मतदारसंघाची निर्मिती ही करण्यात आली. यानंतर मतदार संघातील अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या लक्षात घेता हा मतदार संघ पुन्हा पंचेवीस वर्षासाठी (२०२८ पर्यंत) अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे.
त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघाला आजपर्यंतच्या ६७ वर्षातील फक्त १० वर्षे सर्वसाधारण उमेदवारांना तर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना ५२ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. यापुढे २०२८ पर्यंत या मतदार संघाचे हे आरक्षण कायम राहणार आहे.
केज विधानसभा मतदारसंघात पहिल्या विधानसभेसाठी १९५७ साली मतदान झाले आणि अनुसूचित जाती या प्रवर्गातुन गोविंदराव गायकवाड यांना या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या नंतर १९६२ साली निवडणुका झालेल्या या निवडणुकीत ही गोविंदराव गायकवाड हेच निवडून आले आणि सर्वप्रथम सलग दहा वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी गोविंदराव गायकवाड यांना मिळाली.
१९६७ साली हा मतदार संघ सर्वसाधारण उमेदवारांसाठी मोकळा झाला. यावेळी झालेल्या निवडणुकीत माजलगाव येथील सुंदरराव सोळुंके हे माजलगाव विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे केज विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आले आणि विजयी झाले. यावेळी सर्वप्रथम या मतदारसंघाला राज्य मंत्रिमंडळात नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुंदरराव सोळुंके यांना काम करण्याची संधी मिळाली. या काळात सुंदरराव सोळुंके यांनी उपमुख्यमंत्री पदाचा उपयोग घेत केज विधानसभा मतदार संघात लक्षणीय विकास कामे केली.
यानंतर १९७२ साली झालेल्या निवडणुकीत बाबुरावजी आडसकर हे विजयी झाले. या निवडणुकीत उच्च शिक्षीत-अभ्यासु आणि सुसंस्कृत अशी प्रतिमा असलेले अँड. बापुसाहेब काळदाते हे बाबुराव आडसकर यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार होते. या निवडणुकीत बाबुराव आडसकर यांनी अँड. बापुसाहेब काळदाते यांचा सरळ लढतीत पराभव केला. या निवडणुकीच्या निकालाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. या निवडणुकीतील विजयानंतर बाबुराव आडसकर हे चांगलेच चर्चेत आले होते.
१९७२ नंतर विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाली आणि हा मतदारसंघ पुन्हा एकदा अनुसूचित जाती साठी आरक्षित झाला. पुढे १९७८ साली मध्यावधी निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत बी.एन. सातपुते हे विजयी झाले. त्यानंतर १९८० साली झालेल्या निवडणुकीत गंगाधर स्वामी यांना या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. विधानसभे साठी १९८५ साली झालेल्या निवडणुकीत परत बी. एन. सातपुते यांना या मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
जी.एन. स्वामी आणि बी. एन. सातपुते यांना १९७८ ते १९९० अशी सलग बारा वर्षे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र या दोघांनाही मतदार संघात फार काही काम करुन आपला ठसा उमटवता आला नाही.
१९९० साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने डॉ. सौ. विमल मुंदडा सारख्या उच्च पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या नवख्या उमेदवाराला संधी दिली. आणि या संधीचे सोने करीत डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी पहिला विजय मिळवला. या पहिल्या निवडणुकीत बी.एन. सातपुते यांच्या विरोधात असलेल्या नकारात्मक मतांचा फायदा डॉ. सौ. विमल मुंदडा यांना झाला. या पहिल्या विजयानंतर १९९५ साली, २००० साली , २००५ साली आणि २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी सतत चढ्या मतांनी विक्रमी विजय संपादन केला. या मतदारसंघाचे सलग बावीस वर्षे प्रतिनिधित्व करण्याची संधी डॉ. सौ. विमल मुंदडा यांना मिळाली. या बावीस वर्षाच्या काळात डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी राज्यमंत्री मंडळात राज्यमंत्री, कँबिनेट मंत्री असा चढा प्रवास केला. राज्य मंत्रीमंडळातील पाचव्या क्रमांकाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्री पदावर काम करण्याचीही संधी त्याना मिळाली. या मंत्रीपदाच्या काळात त्यांनी मतदार संघात अनेक दिसणारी आणि लक्षात राहणारी विकास कामे केली. अंबाजोगाई जिल्हा व्हावा याचे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी निर्माण करुन ठेवले. याच काळात कँन्सर सारख्या असाध्यरोगाने त्यांना ग्रासले आणि २०१२ साली आवजड उद्दोग मंत्री म्हणून काम करीत असतांनाच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. केज विधानसभा मतदारसंघातील ६७ वर्षाच्या कालावधीतील डॉ. सौ. विमल मुंदडा याचा २२ वर्षाचा कार्यकाळ या मतदारसंघातील लोकांना सन्मान मिळवून देणारा ठरला.
२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्या. या पुर्नरचनेत केज विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक परीसीमा बदलल्या. या नव्य भौगोलिक परिस्थितीत तयार झालेला केज विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत डॉ. सौ. विमल मुंदडा या आजारी असतांनाही मतदारांनी त्यांना ४० हजाराच्या प्रचंड मताधिक्याने निवडुन दिले. ही पाच वर्षाची टर्म पुर्ण होण्याच्या आतच डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर २००९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ. सौ. विमल मुंदडा यांचे खंदे समर्थक पृथ्वीराज साठे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या तीन वर्षाच्या काळात आ. साठे आणि मुंदडा यांच्या मधे टोकाचे मतभेद निर्माण झाले. या मतभेदाचे पडसाद २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमटले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सौ. नमिता अक्षय मुंदडा यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत पृथ्वीराज साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात सहभाग घेतला. सौ. नमिता मुंदडा आणि सौ. संगीता ठोंबरे यांच्या सरळ लढतीत भाजपाच्या सौ. संगीता ठोंबरे विजयी झाल्या. मात्र पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रा. सौ. संगीता ठोंबरे या मतदारांशी फारशी आत्मियता साधु शकल्या नाहीत. वात मतदार संघाचे विकासाचे प्रश्नही सोडवू शकल्या नाहीत.
२०१९ च्या निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या नमिता मुंदडा यांनी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा मध्ये प्रवेश केला. आणि २०१९ घ्या निवडणुकीत त्या भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढल्या. पृथ्वीराज साठे आणि नमिता मुंदडा यांच्या मध्ये ही सरळ लढत झाली आणि या निवडणुकीत नमिता मुंदडा या विजयी झाल्या. राजकारणात तशा नवख्या असलेल्या नमिता मुंदडा यांनी आपल्या पाच वर्षाच्या कालावधीत नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले पती अक्षय मुंदडा यांच्या सोबत मतदार संघाचे असंख्य प्रश्न सोडविण्यात यशस्वी झाल्या. मतदार संघात सर्वाधिक विकासकामांसाठी निधी आणणा-या त्या पहिल्या आमदार ठरल्या.
आता २०२४ घ्या विधानसभा निवडणुका २० नोव्हेंबर रोजी होणार आहेत. विद्यमान आ. नमिता अक्षय मुंदडा या आपली पावले दमदार पध्दतीने रोवून या निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. भाजपाकडून उमेदवारीसाठी एक ही अर्ज आला नसल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा पृथ्वीराज साठे हे आपले दंड थोपटून उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या निवडणुकीत प्रा. सौ. संगीता ठोंबरे या ही प्रबळ दावेदार आहेत. पक्षांची उमेदवारी मिळो अथवा न मिळो प्रा. संगिता ठोंबरे यांची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा सध्या होते आहे. वृत्तपत्रात पान-पान माहिती छापून आणणा-या डॉ. अंजली घाडगे या मात्र उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत मागे पडलेल्या दिसत आहेत. याही पेक्षा काही नवीन राजकीय समीकरणे आपल्याला पहायला मिळतील का? हे लवकरच पहायला मिळणार आहे..
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.