Uncategorizedमहाराष्ट्र
आ. नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
१५ मे २०२५ पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने व भारतीय लष्कराने संयुक्तपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या अत्यंत प्रभावी मोहिमेमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले गेले. देशाच्या सुरक्षेसाठी जीवाचे रान करणाऱ्या वीर जवानांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी आज अंबाजोगाई शहरात ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले.
आ. नमिता मुंदडा यांचा पुढाकार
या रॅलीचे आयोजन केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या पुढाकाराने करण्यात आले. शहरातील मंडीबाजार येथून सुरू झालेली ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, सदर बाजार मार्गे भगवान बाबा चौक व अखेरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समारोपाच्या सोहळ्यात रूपांतरित झाली.
माजी सैनिक व देशप्रेमींचा मोठा सहभाग
शेकडो नागरिक, विविध सामाजिक संस्था, माजी सैनिक, युवक संघटना, विद्यार्थी, महिला व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीदरम्यान ‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’ आणि ‘भारतीय लष्कर अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्हालं.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होत आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी एका पत्रकार परिषदेत ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, देशाच्या सुरक्षिततेशी कोणीही खेळ करू शकत नाही. लष्कराच्या धाडसी कारवाईमुळे भारताचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असून, त्यांचा सन्मान करण्यासाठी राज्यभर विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येईल, असे वक्तव्य केले होते. अंबाजोगाईतील रॅली हे त्याचेच एक उदाहरण ठरले.
