अमलेश्वर मंदिर जतन व दुरुस्ती साठी ८ कोटी ७७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर


आ. नमिता मुंदडा यांनी केले विशेष प्रयत्न
अंबाजोगाई शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक भावनांशी जोडल्या गेलेल्या अमलेश्वर मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्या वतीने ८ कोटी ७७ लक्ष ५५ हजार ८३४ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने या संदर्भात शासन निर्णय क्र. पुवसं २०२४/प्र.क्र.६३/सां.का.३ दि. १ मार्च २०२४ अन्वये हे आदेश काढण्यात आले आहेत.
सदरील आदेशात पुढे असे म्हटले आहे की, मंत्रीमंडळाची विशेष बैठक छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक १६.०९.२०२१ रोजी पार पडली होती. त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये मराठवाडा विभागातील ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन करण्याचा समावेश करण्यात आला असून विशेषतः त्यामध्ये अंबाजोगाई येथील प्राचीन वास्तुस्थळाचा विकास करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे. मा. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अंबाजोगाई येथील अमलेश्वर मंदिराचे जतन व दुरुस्ती कामासाठी रु.८,७७,५५,८३४/- इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत उपनिर्दिष्ट पत्रान्वये संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय विनंती केली आहे, या स्मारकाचे अंदाजपत्रक सन २०२२-२३ ची राज्य दरसूची व स्थानिक बाजारभावानुसार तसेच पुरातत्व संकेतानुसार तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरूस्ती कामाच्या रु.८,७७,५५,८३४/- इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


सदरील शासन निर्णयान्वये अमलेश्वर मंदीर, ता. अंबाजोगाई, जि. बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरूस्तीकामाच्या रू.८,७७,५५,८३४/- (अक्षरी रूपये आठ कोटी सत्त्याहत्तर लाख पंचावन्न हजार सहाशे चऔतईस मात्र) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
सदरील प्रशासकीय मान्यतेनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करुन याप्रकरणी न्युनत्तम निविदेचा प्रस्ताव तसेच खर्चास वित्तीय मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केल्यानंतर प्रस्तावित खर्चास वित्तीय मान्यता देण्यात येईल.
या साठी होणारा खर्च मागणी क्र. झेडडी-२, १०३, पुरातत्वशास्त्र, (०१) (०६) राज्यातील ऐतिहासिक व सांकृतिक दृष्ट्या महत्वाचे किल्ले व धार्मिक स्थळे यांची जपणूक व संरक्षण कार्यक्रम २२०५-१३०२ २७ लहान बांधकामे या लेखाशिर्षात त्या त्या वर्षी उपलब्ध होणाऱ्या तरतूदीतून भागविण्यात यावा. असे या आदेशात म्हटले आहे.
सदरील शासनर्णय हा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निगर्मित करण्यात आला असून या आदेशावर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचीव नंदा मारोती राऊत यांची स्वाक्षरी आहे.


▪️आ. नमिता मुंदडा यांचे प्रयत्न
अंबाजोगाई शहराच्या धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरेशी जोडल्या गेलेल्या या अमलेश्वर मंदिर राज्य संरक्षित स्मारक जतन व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आ. नमिता मुंदडा या स्वतः एक आर्किटेक्ट असून केज विधानसभा मतदारसंघातील पुरातत्व काळातील वास्तु आणि मंदिरे जतन करून त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामांवर त्यांचे विशेष लक्ष आहे. याच माध्यमातून त्यांनी अंबाजोगाई शहरात असलेल्या संकलेश्वर मंदीर, भुचरनाथ मंदिर, आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी, जोगाई सभामंडप, छोटा हत्ती खाना व इतर धार्मिक स्थळांच्या जतन व दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करुन घेतला आहे. आता या अमलेश्वर मंदिर जतन व दुरुस्ती साठी ८ कोटी ७७ लक्ष ५५ हजार ८३४ रुपयांचा विशेष निधी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडुन मंजूर करुन घेतला आहे.
▪️ अमलेश्वर मंदिरा चे धार्मिक महत्व
अंबाजोगाई शहर आणि परीसरातील प्रसिद्ध मंदिरापैकी एक असलेले हे अमलेश्वर मंदिर. बाराव्या शतकातील अमलेश्वर मंदिर हे असेच एक देखणे शिवमंदिर आहे. मराठवाड्यातील मंदिर स्थापत्याचा विचार केला तर मंदिर बांधणीच्या चळवळीची तिसरी अवस्था अंबाजोगाईच्या अमलेश्वर मंदिराच्या स्थापनेपासून सुरु होते. बाराव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात हे मंदिर उभारले गेले असावे. या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर नक्षीदार पट्टयांचा वापर करणे हे या काळातले वैशिष्ट्य अमलेश्वर मंदिरावर स्पष्टपणे दिसते. अमलेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवर काही शिल्प आहेत. या भिंतीचा काही भाग बाहेर काढलेला असून त्याला स्तंभाचा आकार दिला गेला आहे व पुढे आलेला भाग पानाफुलाच्या भुमीतीय आकृती शिल्पांनी क्षितिज समांतर पट्टे शिल्पीत केले आहेत. जो चालुक्यकालीन वैशिष्ट्यांचा प्रभाव वाटतो. नर्तनावस्थेतील गणेश शिल्प या मंदिरावरील एक उल्लेखनीय निर्मिती आहे. असे गणेश शिल्प क्वचितच पाहावयास मिळते. चंडेल राजाने उभारलेल्या खजुराहोच्या कंडारेश्वर मंदिराच्या पश्चिम भिंतीवर तळाला असे शिल्प आढळून आल्याचे सांगण्यात येते.
या मंदिराला लागूनच मागील बाजूस खडकात कोरलेले एक तिर्थकुंड असून या तिर्थाला अनन्य साधारण महत्व आहे. या तिर्थाचे वैशिष्टय म्हणजे तिर्थाच्या पाक्याच्या डाव्या बाजूस बेलाचे पान टाकले तर ते बुडते; पण उजव्या बाजूस टाकले तर ते मात्र तरंगत राहते. सभामंडपाच्या छतावरील शिळेवर अंकीत शिल्पावरुन यादवकालीन लोकप्रिय भारतीय वाद्यांचा परिचय होतो. अलिकडेच या मंदिराचा जिर्णोद्धार भक्तांनी केला असून भक्तगणांसाठी काही खोल्या या ठिकाणी बांधण्यात आल्या आहेत.