अंबाजोगाई पिपल्स बॅंकेचे मु.कार्यकारी अधिकारी संजय जड यांचे निधन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230820_151025-1024x1018.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/08/IMG_20230820_151025-1024x1018.jpg)
अंबाजोगाई पिपल्स बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जड यांचे -हदयविकाराने २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता लातुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
अंबाजोगाई शहरातील गुरुवार पेठ विभागातील रहिवासी असलेले संजय जड यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर आपल्या नोकरीची सुरुवात येथील अंबाजोगाई पिपल्स बॅंकेत कनिष्ठ लिपिक या पदापासून सुरुवात केली. आपल्या कामाच्या पध्दतीवर, बॅंकींग क्षेत्रातील अभ्यासाच्या कौशल्यावर व संचालक मंडळाचा विश्वास संपादन करीत त्याने अल्पावधीतच मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्च पदावर मजल मारली. अतिशय संवेदनशील कवी व हळव्या मनाच्या संजय याने दररोज कोट्यावधी रुपयांची आकडेमोड करतांना आपल्या हळव्या मनाला कोठेही तडा जावू दिला नव्हता. बॅंकेचा व्याप, मुलांची व कुटुंबाची काळजी घेत स्वतः चे छंद प्रामाणिकपणे जोपासत जीवन जगण्याची अनोखी शैली त्याने आत्मसात केली होती.
मागील आठवड्यात तो कळसूबाई शिखर सर करण्यासाठी गेला होता. शिखरावर चढाई करीत असतांनाच श्वसनाचा त्रास होवू लागल्यामुळे तो परत आला. अंबाजोगाई येथे प्राथमिक तपासण्या करुन तो पुढील उपचारासाठी लातुर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी त्यांच्या दोन रक्तवाहिन्या ९० व १०० टक्के ब्लॉक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर लागलीच स्प्लेंडर टाकुन या ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या सुरळीत केल्या होत्या. मात्र दुसरेच दिवशी त्याची आणखी एक रक्त वाहिनी ब्लॉक झाली आणि -हदयविकाराचा तीव्र झटका त्यास आला. या वर उपचार सुरु असताना प्रकृतीने त्याला साथ न दिल्यामुळे आज २० ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता त्याने लातुर येथील खाजगी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
संजय जड यांच्या पश्चात पत्नी, तीन मु्लं आणि इतर परीवार आहे.
संजय जड यांच्या अकाली निधनाची वार्ता शहरभर वा-यासारखी पसरली. आणि शहरातील विविध विभागांतील त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होवू लागली. संजय जड हे गेली अनेक वर्षांपासून व्यक्तिगत रित्या माझ्याशी जोडल्या गेले होते. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीच न भरुन निघणारी आहे. संजय जड यांना माध्यम न्युज नेटवर्क परिवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली.
२१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. अंत्यविधी
संजय जड यांच्या निधनाच्या बातमीने संपुर्ण शहरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे पार्थिवावर २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.