अंबाजोगाई आणि परळी या दोन शहरांच एक महानगर करण्याचा ध्यास


कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांच वक्तव्य
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
महाराष्ट्राच्या राजकारणात असलेली माझी प्रतिष्ठा पणाला लावून अंबाजोगाई आणि परळी शहराचा एवढा विकास करेल की, अंबाजोगाई आणि परळी ही दोन शहरांचे लवकरच एक महानगर निर्माण होईल असे वक्तव्य कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.
अंबाजोगाई वकील संघाने केला सत्कार


महाराष्ट्राचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे हे एका न्यायालयीन प्रकरणातील सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील न्यायालयात आले असतांना अंबाजोगाई वकील संघाने त्यांचा मंत्रीमंडळातील पुर्ननियुक्तीचे स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या सत्कारास उत्तर देताना व्यक्त केले.
राजस्थानच्या जिल्हा निर्माण लोन अंबाजोगाईत!
आपल्या विस्तारीत वक्तव्यात ना. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, राजस्थानमध्ये होवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील मुख्यमंत्र्यांनी ५० नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे लोन एवढे पसरले की, ते थेट अंबाजोगाईत येवून धडकले.
भविष्यात अंबाजोगाई च जिल्हा होईल!
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री म्हणून मी आपल्याला एवढेच सांगू इच्छितो की, मागील साडे तीन वर्षांच्या काळात मी मंत्री होतो तेंव्हा आणि आता पुन्हा नव्याने मंत्री मंडळात गेलो तेंव्हापासून एकदाही महाराष्ट्रात नवीन जिल्हा निर्मिती संदर्भात चर्चा झालेली नाही. मात्र मी एवढे निश्चित पणाने सांगतो की, महाराष्ट्रात जेंव्हाकेंव्हा जिल्हे निर्माण होतील तेंव्हा अंबाजोगाईच जिल्हा निर्माण होईल.


अंबाजोगाई परळी या दोन शहरांच एकच महानगर बनवण्याच स्वप्न!
याचाच संदर्भ घेत ना. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, भविष्यात मी अंबाजोगाई आणि परळी शहराचा एवढा विकास करणार आहे की, अंबाजोगाई आणि परळी ही दोन शहरे राहणार नाहीत तर या दोन शहरांच एक महानगर बनेल. महाराष्ट्राच्या राजकारणातील माझी राजकीय प्रतिष्ठा जोपर्यंत आहे तोपर्यंत या दोन्ही शहराच्या विकासाचा आणि या दोन शहरांच एक महानगर बनवण्याचा ध्यास मी घेतला आहे. या दोन शहरांना जोडणा-या आणि या दोन्ही शहराचा विकास करणा-या अनेक योजना माझ्या डोक्यात आहेत आणि येत्या दोन वर्षांत या विकासाच्या योजना प्रत्यक्षात कशा आणता येतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
परळी-अंबाजोगाई-तुळजापुर ही तीर्थक्षेत्र जोडणारा नवा द्रुतगती मार्ग लवकरच होणार
अंबाजोगाई आणि परळी या दोन शहरांचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता ही दोन्ही शहरे तुळजापूर या धार्मिक तीर्थक्षेशी द्रुतगती मार्गाने कशी जोडली जातील यासाठी मी नुकतीच केंद्रीयमंत्री ना.नितीन गडकरी साहेबांची भेट घेतली असून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हा नवीन रस्ता लवकरात लवकर कसा पुर्ण होईल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
जिल्हा निर्मितीची मागणी आणि महानगराचा नवा विचार!


ना. धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई आणि परळी ही दोन शहरे एकत्र आणून या दोन शहरांच एक महानगर बनवण्याचा मानस आज अंबाजोगाई वकील संघात जाहीर पणे बोलुन दाखवला. या “मानस” चा संदर्भ राजकीय विश्लेषक अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भातील मागणी सोबत जोडत आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री असताना “अंबाजोगाई-परळी” या शहरांना जोडुन नवा जिल्हा व्हावा असे सुतोवाच केले होते. कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज केलेले वक्तव्य ही याच आशयाला धरुन आहे असे जाणकारांचे मत आहे.
भविष्यात अंबाजोगाई -परळी जिल्ह्याचे संकेत!
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी पुढे येवून आता जवळपास ४० वर्षे पुर्ण होत आली आहेत. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीला मोठा अडथळा परळीचाच ठरत आला असल्याचे जाणकार राज्यकर्त्यांचे मत आहे. आता अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी मागे पडुन अंबाजोगाई परळी या दोन शहरांना एकत्र जोडून निर्माण करण्यात येणारा नवं महानगराच्या (अंबाजोगाई-परळी) जिल्ह्याचा नवा प्रस्ताव पुढे येतो की काय अशा हालचालींना सुरुवात झाली की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.