अंबाजोगाईचे वृध्दत्व मानसिक आजार केंद्राचे “टेली मानस केंद्र” राज्यात प्रथम


वर्षभरात केले १८ हजार ४१३ मानसिक रुग्णांवर उपचार
बीड जिल्ह्याच्या लोकनेत्या तथा तत्कालीन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री कै.. डॉ. सौ. विमल मुंदडा यांच्या पुढाकाराने अंबाजोगाई शहरालगत लोखंडी सावरगाव येथे ४० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रात सुरु करण्यात आलेले टेली मानस केंद्र मानसिक रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर आले असल्याची माहिती या केंद्राचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी दिली आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्री असताना ज्या दुरदृष्टी डॉ. सौ. विमल मुंदडा यांनी हे वृद्धत्व व मानसिक आजार केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला होता त्याची फलश्रुती आता टेली मानस केंद्राद्वारे करण्यात आलेल्या उपचाराच्या माध्यमातून दिसुन येत आहे.


संपुर्ण देशभरातच नव्हे जगात २०१९ व २०२० साली कोवीड या साथ रोगाने सर्वसामान्य माणसांचे आरोग्य धोक्यात आणले. या साथ रोगानंतर सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात मानसिक आजार वाढल्याचे अनुमान दिसुन आले. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ठाणे, पुणे आणि अंबाजोगाई येथे टेली मानस केंद्र ही मानसिक रुग्णांवर उपचार करणारी नवी योजना सुरु केली. या तीन ही टेली मानस केंद्रात मानसोपचार तज्ञांसह समुपदेशकांच्या नियुक्त्या केल्या. कोणत्याही व्यक्तीला मानसिक आजारासंदर्भात तक्रार असल्यास त्यांना टोल फ्री क्रमांकावरुन मोफत सल्ला व समुपदेशन करण्याचे काम हे केली मानस केंद्र करते. या संपुर्ण प्रक्रियेत मानसिक समुपदेशनासाठी फोन केलेल्या व्यक्तीचे नांव अत्यंत गोपनीय ठेवण्यात येते. वारंवार सल्ला व समुपदेशन करुन अशा व्यक्तींचे मानसिक आजार टेली कम्युनिकेशन व्दारे बरे करण्यात येतात.


या टेली मानस केंद्रात व्यसनमुक्ती, विसराळुपणा, वेडेपणा, चिंता, भिंती, भुतबाधा, वर्तमानातील बदल, वारंवार तेच विचार येणे, संशय येणे, घाबरल्या सारखे वाटणे, आत्महत्येचा विचार येणे, उन्माद, लैंगिक समस्या, सतत भास होणे, उदासीनता, डोकेदुखी, मतिमंदत्व, स्किझोफ्रोनिया, करणी, अंगात येणे, निद्रानाश, अति नैराश्य, बालवयातील मानसिक समस्या या आजारांवर मोफत उपचार, सल्ला व समुपदेशन करण्यात येते.
राज्यात सुरु करण्यात आलेल्या ठाणे, पुणे आणि अंबाजोगाई येथील टेली मानस केंद्रात गेल्या वर्षभरात ४५ हजार रुग्णांना या सेवेच्या माध्यमातून उपचार, सल्ला व समुपदेशन करण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक २० हजार रुग्ण अंबाजोगाई येथील टेली मानस केंद्राद्वारे घेण्यात आलेल्या उपचार, सल्ला व समुपदेशनाने बरे झाले आहेत.
अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व व मानसिक आजार केंद्र रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या या टेली मानस केंद्राची फारशी जनजागृती अजून ही झालेली नसली तरी या केंद्रातुन ब-या झालेल्या मानसिक रुग्णांची संख्या मोठी आहे. या टेली मानस केंद्रात मिळणाऱ्या मानसिक उपचाराबध्दल जनजागृती करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे, मानसोपचार तज्ञ डॉ. मनोज तोटावाड, डॉ. शिवराज पेस्टे यांच्या सह २० समुपदेशक मानसिक रुग्णांचा आजार बरा करण्यासाठी सतत परिश्रम घेत आहेत.




▪️कधीही कॉल करा;२४ तास सेवा
१४४१६ हा टोल फ्री क्रमांक २४ तास चालू असतो. प्रत्येक सहा तासाला ५ समुपदेशक आणि एक मानसोपचार तज्ज्ञ येथे कर्तव्यावर असतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही वेळेत निसंकोचपणे कॉल करावा, असे अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले आहे.


बीड जिल्ह्याच्या लोकनेत्या डॉ. सौ. विमल मुंदडा यांच्या प्रयत्नातून २००८ साली अंबाजोगाई येथे ४८ कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रातील एकमेव सुसज्ज असे वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्राची वास्तु निर्माण करण्यात आली होती. इमारतीच्या संपुर्ण बांधकामानंतर अनेक वर्ष ही इमारत वापराअभावी धुळ खात पडून होती. मात्र २०१९ साली कोवीड चा प्रादुर्भाव सुरू झाला आणि वापराअभावी धुळ खात पडलेल्या या इमारतीत राज्यातील १,००० खाटांचे सुसज्ज असे कोवीड हॉस्पिटल सुरू झाले.
कोवीड नंतर या भव्यदिव्य इमारतीत स्वतंत्र स्त्री रुग्णालय व सामान्य रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या सामान्य रुग्णालयात मानसिक रुग्णांवर उपचार करणारे हे “टेली मानस केंद्र” सुरु करण्यात आले असून याच रुग्णालयात मानसिक रुग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली आहे. मानसिक रुग्णांसाठी सुरु केलेल्या ओपीडी सही आता चांगलाच प्रतिसाद मिळत असून मानसिक रुग्ण दुरुस्त होण्याची प्रमाण ही वाढले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी दिली आहे.